Monday, 7 November 2011

पहिला दिवाळसण (भाग १)

'पहिला दिवाळसण' म्हणजे नक्की काय रे? तर माझ्या, लग्न न झालेल्या पण सज्ञानि मित्रांना (तश्या मला फारश्या मैत्रिणी नाहीतच आणि ज्या आहेत त्यांना नक्कीच माहिती आहे, म्हणून फक्त 'मित्रांना')  सांगतो, कि 'दिवाळी' हि नेहमीचीच असते. पण लग्ना नंतर आलेली पहिलीच दिवाळी म्हणजे 'पहिला दिवाळसण' होय.

दिवाळी
तर गोष्ट सुरु होते ती माझ्या पहिल्या वहिल्या दिवाळसणाच्या तयारी पासून....

तशी तयारी सुरु झाली ती ९० दिवस आधी पासूनच, आता ९० दिवस तुम्हाला जास्त वाटत असतील पण जे लोक रेल्वेनी प्रवास करतात त्यांना ९० दिवसांचे महत्व नक्कीच माहित असेल. तर मी कॅलेंडर तपासून, मोबाईल वर, ज्या दिवशी जायचे आहे त्याच्या ठीक ३ महिने अगोदरच्या दिवशी (म्हणजे बुकिंग सुरु होते, त्या दिवशीच) सकाळीच बरोबर ०७.३० वाजताचा (त्या अगोदर मी ठरवून सुद्धा उठू शकत नाही, हि खात्री बाळगूनच ०७.३० चा) अलार्म लावला. आणि घरच्या बी.एस.एन.एल. ब्रोडब्यांड वरून रेल्वे च्या ढेपाळलेल्या संकेत स्थळावरून ठीक ८ वाजता सुरु झालेल्या आरक्षणा मध्ये आम्हा दाम्पत्याचे (दाम्पत्याचे म्हणजे 'दोन') तिकीट बुक केले. (एक सूचना बी.एस.एन.ल.वाले हा ब्लॉग कुठल्याच प्रकारे स्पोन्सर करत नाही आहेत. ते फक्त वास्तविकता यावी म्हणून उल्लेख केलेला आहे). तिकीट बुक करताना आम्हा उभयतांची ऑफिसची वेळ सांभाळून त्यातल्या त्यात उशिराच्याच म्हणजे ६.१५ च्या गाडीचे बुकिंग केले होते. आणि हो पहिलाच दिवाळसण होता म्हणून वातानुकुलीत डब्ब्याचे केले होते. ('जावईबापू' 'मुलीला' घेऊन साध्या डब्ब्यानी कसे येणार होते न?). लगेच वन टायर कि टू टायर ह्या विचारात वाचकाने कृपा करून पडू नये.